मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी
मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी भेट
जालना/मुंबई, ३० जून :**
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सुमारे अर्ध्या तास चाललेल्या या चर्चेत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल विचारविनिमय झाला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठवले यांच्याकडे सुपूर्द केले. मंत्री आठवले यांनी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून लवकरच फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली.
रामदास आठवले यांनी सांगितले की, "मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, मात्र काही मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण योग्य आहे का, टिकेल का, याबाबत समाजात शंका आहे. कुणबी नोंदी नसलेल्या लोकांच्या लाभासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे संस्थानचे गॅझेट लागू करण्याचा विचार व्हावा."
जरांगे-पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मोठे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्याआधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. या संदर्भात आठवले म्हणाले, “त्यांची मागणी योग्य आहे आणि ती मी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. मराठा समाजातील गरजू आणि मागास विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, ही भूमिका मी आधीपासून मांडत आलो आहे.”
या भेटीमुळे राज्यातील मराठा आरक्षण चळवळीला नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments