हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी
माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं डोंबिवलीच्या एका प्रामाणिक रिक्षाचालकाने.
डोंबिवली, दि. 29 जून 2025
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्टेशन ते शंकेश्वर स्टॅन्ड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका दांपत्याची महत्त्वाची पिशवी रिक्षात विसरली गेली. या पिशवीत रोख रक्कम आणि कपडे असा महत्त्वाचा ऐवज होता.
ही पिशवी रिक्षाचालक संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली होती. विशेष म्हणजे, पिशवी हरवली आहे हे लक्षात येताच त्या दांपत्याच्या चेहऱ्यावर काळजी व हतबलता स्पष्ट दिसत होती. महिलेला तर अश्रू अनावर झाले होते. त्यांना वाटले होते की आपली रोख रक्कम व वस्तू परत मिळणे अशक्य आहे.
मात्र रिक्षा स्टॅन्डवरील इतर सहकारी रिक्षाचालकांनी त्यांना धीर दिला आणि शक्य तेवढ्या लवकर वस्तू शोधण्यास सुरुवात केली.
आणि जर ती संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली असेल तर ती भेटणारच असा विश्वासही दिला. प्रवाशांनी दिलेल्या रिक्षा व चालकाच्या वर्णनावरून रिक्षाचालकांनी अंदाज बांधला की कदाचित संतोष वरकुटे यांच्या रिक्षातच ती पिशवी राहिली असावी.
याच दरम्यान संतोष वरकुटे रिक्षा बंद करण्याच्या तयारीत होते. शेवटचं भाडं झाल्यानंतर त्यांना रिक्षात ती पिशवी दिसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती पिशवी घेऊन स्टँडकडे धाव घेतली.
तितक्यात त्यांच्या सहकाऱ्यांचा फोन आला व त्यांनी खात्री केली की तीच हरवलेली पिशवी आहे. त्या दांपत्याला तातडीने बोलावून देण्यात आले आणि पिशवी व रोख रक्कम जशीच्या तशी परत करण्यात आली.
हरवलेली पिशवी परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी संतोष वरकुटे आणि स्टँडवरील सर्व रिक्षाचालकांचे मनापासून आभार मानले. या प्रसंगातून रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाचा आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श उदाहरण समोर आला आहे.


Comments