लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन
लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, अपघातांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी
मुंबई | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, रखडलेली दुरुस्ती आणि प्रशासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे सामाजिक कार्यकर्ते आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान लातूरमधील महामार्गांची तात्काळ दुरुस्ती करावी, अपघातांना कारणीभूत ठरलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी सांगितले की, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे उखडले असून मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात होत असून अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. तरीही संबंधित प्रशासन आणि शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनात शासनाने तातडीने विशेष निधी मंजूर करून लातूरमधील सर्व खराब रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अपघातग्रस्त कुटुंबांना योग्य मदत द्यावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर येत्या काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला आता पूर्णविराम मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.


Comments