डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात साजरी; रामदास आठवले यांचे प्रेरणादायी भाषण


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात साजरी; रामदास आठवले यांचे प्रेरणादायी भाषण

न्यूयॉर्क, 17 एप्रिल – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही संपूर्ण जगाला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवतात. त्यांच्या विचारांचा जागतिक स्वीकार हेच त्यांच्या कार्याचं मोठं यश असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आठवले यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे मानवतेचा आणि समतेचा दीपस्तंभ असल्याचे सांगितले. जगभरातील सामाजिक न्यायाच्या लढ्यांना आजही त्यांच्या विचारांतून दिशा मिळते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या दौऱ्यात त्यांच्या सोबत पत्नी सौ. सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले उपस्थित होते. भारताचे अमेरिकेतील कॉन्स्युल जनरल श्रीकांत प्रधान व युनोतील भारताचे प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात ना. आठवले यांचे स्वागत केले.

या ऐतिहासिक कार्यक्रमात न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दिलीप म्हस्के आणि दीपक बन्सल यांनी ना. आठवले यांचा सत्कार केला.

अमेरिकेत लाखो अनुयायांनी यंदाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमामुळे बाबासाहेबांचे विचार जागतिक व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान ना. आठवले यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रात साजरी झालेली ही भीम जयंती ऐतिहासिक ठरली असून, ती अमेरिकेतील भारतीय समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

ना. रामदास आठवले यांचा अमेरिका दौरा 18 एप्रिल रोजी संपत असून, ते भारतात परतणार आहेत. त्यांचे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

__________________________________________________

_________________________________________________

– हेमंत रणपिसे,
   प्रसिद्धी प्रमुख

________________________________________________

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी