खारघरमध्ये SFA & ATP अकॅडमीवर पालकांची फसवणुकीचा आरोप; दलित पँथरची चौकशीची मागणी
खारघरमध्ये SFA & ATP अकॅडमीवर पालकांची फसवणुकीचा आरोप; दलित पँथरची चौकशीची मागणी
नवी मुंबई (खारघर) : खारघर परिसरातील SFA & ATP अकॅडमीविरोधात पालकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा मुद्दा पुढे आणला आहे. या प्रकरणाची दखल घेत दलित पँथर संघटनेने सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी मुलांच्या प्रशिक्षणाबाबत मोठमोठी आश्वासने देत प्रवेश घेतला. मात्र प्रत्यक्षात त्या आश्वासनांप्रमाणे सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण किंवा आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक झाली असून, मुलांवर मानसिक ताणही निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दलित पँथर संघटनेचे नेते डॉ. स्वप्निल ढसाळ, डॉ. संगीता विष्णू ढसाळ, संजय वैद्य आणि वकील रूपाली सावंत उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
संघटनेने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत :
* प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी
* संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
* पीडित पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवाव्यात
दरम्यान, पालकांनीही प्रशासनाकडे धाव घेतली असून, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे खारघर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित अकॅडमीविरोधात जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
सरकार आणि प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments