AICC अल्पसंख्यांक विभागात डॉ. प्रशांत इंगळे यांची राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती


**मुंबई, २ जून :** सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील बौद्ध समाज आणि जगभरातील बौद्ध अभ्यासक यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत या नियुक्तीची अधिकृत माहिती देण्यात आली. या वेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिल्लीतील इंदिरा भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या AICC अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशभरातील विविध समाजघटकांशी संवाद वाढवणे, संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींना बळ देणे या उद्देशाने विभागाच्या कार्याचा विस्तार करण्यात येत असून त्याअंतर्गत डॉ. इंगळे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉ. इंगळे हे आंबेडकरी, विद्यार्थी आणि सामाजिक चळवळींमध्ये दीर्घकाळ सक्रिय राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. बौद्ध समाज, सामाजिक समता, मानवाधिकार आणि संविधानिक अधिकारांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून देशातील विविध सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे.

नव्या पदाच्या माध्यमातून भारतातील बौद्ध उपासक-उपासिका, विविध बौद्ध संघटना, धर्मसंस्था, संशोधक तसेच जगभरातील बौद्ध अभ्यासक यांच्याशी समन्वय साधण्याचे काम ते करणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवकल्याणाशी संबंधित उपक्रम राबविण्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादाचे नवे पूल उभारण्यावर भर दिला जाणार आहे.



पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. इंगळे यांनी अल्पसंख्यांक विभाग हा केवळ धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी मर्यादित नसून दलित, मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त, बौद्ध तसेच इतर वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करणारे व्यापक व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले. संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या आधारे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत सामाजिक परिवर्तनाची परंपरा अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान, ५ आणि ६ जून रोजी नवी दिल्ली येथे अल्पसंख्यांक विभाग व मागासवर्गीय विभागाचे संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून सामाजिक, शैक्षणिक, युवक, संविधानिक आणि संघटनात्मक विषयांवर व्यापक चर्चा होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

डॉ. प्रशांत इंगळे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रासह देशातील बौद्ध समाजाला राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा सामाजिक व राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी